गणेशमूर्ती मातीच्याच हव्यात !!!
गणेश हे विद्येचे आराध्य दैवत. दरवर्षी आपण जल्लोष आणि उत्साहात गणशोत्सव साजरा करतो. गणरायाकडून खूप काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. म्हणूनच कोणत्याही कार्यात सर्वप्रथम पूजेचा मान दिला जातो तो विघ्नहर्त्यालाच. गणेशाला २१ दुर्वा वाहतात. गणपतीला फुलांचा हार घातला जातो. एकंदरीत गणेशाचे निसर्गाशी सलगीचे नाते आहे. १०-११ दिवस सण उत्साहात साजरा केल्यानंतर विसर्जनाच्या वेळी मात्र गणेशमूर्तीची अवस्था फार दयनीय होते. विसर्जनानंतर समुद्रकिनाऱ्यावर मूर्तींचे भग्नावशेष आढळतात. आपणाकडून हे दृश्य पहावल्या जात नाही. म्हणून आपण पीओपी (प्लास्टर ऑफ पॅरीस) च्या मूर्तींऐवजी मातीच्या गणेशमुर्तींचीच स्थापना करायला हवी.
केवळ मूर्ती आकर्षक दिसण्यासाठी पीओपीच्या मूर्ती घेणे योग्य नव्हे. पीओपी पासून तयार केलेली मूर्ती पाण्यात विरघळत नाहीत. त्यामुळे समुद्रातील लाखो गणेशमूर्तींमुळे समुद्राच्या पाण्याची पातळी वाढत आहे. मूर्ती आकर्षक दिसण्यासाठी वापरण्यात येणारे गोल्डन कलर, डिस्टेंबर, कॉपर पावडर, क्लोरोसन पावडर, फेव्हिकॉल, पोटॅशियम सायनाइड, थिनर आदी रासायनिक पदार्थ पर्यावरणालाच नव्हे तर मुर्तीकारांकरिता सुद्धा हानिकारक आहेत. पीओपीचे रंग हे विषारी असतात. ज्यावेळी सर्वप्रथम पीओपीचा वापर करण्यात आला तेव्हा मूर्तींची संख्या कमी होती. परंतु आता शहरांमध्ये शेकडो गणेशोत्सव मंडळे आहेत. शिवाय बहुसंख लोकांकडे गणपते बसविले जातात. त्यामुळे दरवर्षी दोन ते अडीच कोटी किलो पीओपी व त्याबरोबर वापरण्यात येणारे विषारी रंग पाण्यात मिसळले जातात. त्यामुळे पाण्यातील जीवांना धोका निर्माण होतो. जल परिसंस्था धोक्यात येते. पर्यावरणालाही धोका निर्माण होतो. तसेच जमिनीतील नैसर्गिक जलस्त्रोतही बंद पडतात. न्यायालयानेही पीओपीच्या मूर्तींवर बंदी घातली आहे.
दुसरीकडे मातीच्या किंवा शाडूच्या मूर्ती या पर्यावरणीय दृष्टीने योग्य आहेत. या मूर्तींचे रंग हे नैसर्गिक असतात. त्यामुळे यापासून पर्यावरणाला अजिबात धोका नाही. श्रीगणेशाची मूर्ती पार्थिव असावी. पार्थिव म्हणजे पृथ्वीवर मिळणाऱ्या साहित्यापासून. मातीची मूर्ती पाण्यात लवकर विरघळते आणि पुन्हा मातीतच एकरूप होते. त्यामुळे समुद्राच्या पाण्याची पातळीही वाढत नाही आणि पाण्यातील जीवसुद्धा सुरक्षित राहतात.
पृथ्वीवरील प्राण्यांमध्ये मानव हा सर्वात बुद्धिमान प्राणी मानला जातो. ईश्वराने मानवाला सर्व गोष्टी भरभरून दिल्या आहेत. आपल्याला निसर्गाची अनमोल देणगी दिली आहे. या निसर्गाचे जतन व संवर्धन करण्याची जबाबदारी आपल्यावर सोपविण्यात आली आहे. निसर्गातील वृक्ष, पशु-पक्षी, नद्या आदींचे रक्षण करणे आपले आद्य कर्तव्य आहे. परंतु आपण आपल्या बेजबाबदार कृत्यांमुळे निसर्गाला बाधा पोचवत आहोत. या दुष्कर्माची फळेही आपण भोगतच आहोत. वृक्षतोडीमुळे प्राणवायूचे प्रमाण कमी झाले आहे. घातक कार्बन डायऑक्साइड वायचे प्रमाण वाढल्याने साहजिकच रोगांचेही प्रमाण वाढले आहे. जागतिक तापमानवाढ आणि ग्लोबल वार्मिंग मुळे बर्फ वितळत आहे. समुद्राच्या पाण्याची पातळी वाढत आहे. शिवाय प्लास्टिकसारख्या अविघटनशील पदार्थांमुळे कचऱ्यामध्ये वाढ होत आहे.
मित्रांनो, अजूनही वेळ गेलेली नाही. पर्यावरणाच्या संवर्धनासाठी सर्वांनी एकत्रित येणे गरजेचे आहे. नाहीतर मानवाच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाल्यावाचून राहणार नाही. याची सुरुवात मातीच्या गणेशमुर्तींच्या वापरापासून करायला हवी. कारण आपण उत्सवात दाखविलेल्या थाटापेक्षा श्रद्धा ही अधिक महत्वाची असते.
• विश्वजीत दीपक गुडधे,
अमरावती.
अमरावती.
================================================================
Congratulations to Indian Olympic Heroes
It is the moment of great proud for all Indians that our athletes have won total six medals in London Olympic Games 2012. This is the most successful Olympic event ever. Indian athletes proved their might by winning two silver and four bronze medals. Sushil Kumar won silver medal in 66 kg freestyle Wrestling in spite of continuous dehydration and vomiting. Vijay Kumar also won silver medal in 25m Rapid Fire Pistol Shooting. Mary Kom (Bronze in 51 kg Boxing) and Saina Nehwal (Bronze in Badminton Singles) showed the Women Power. Both of them won Bronze medals in their respective events. Gagan Narang created history by winning bronze medal in 10m Air Rifle Shooting. Another Indian Wrestler Yogeshwar Dutt won bronze medal in 60 kg freestyle Wrestling. Our athletes have done great job in spite of the facilities available for them. It is true that we are much below of countries like United States and China who have won total 104 and 87 medals respectively. But we have also take in consideration the condition, people's approach, facilities, trainings and lack of money for these games in a country where people have enormous craziness for Cricket. But the success of these heroes will help to encourage the emerging players and to attract them towards these sports. Hope that we will get more and more shining players in our country.
• Vishwajeet Deepak Gudadhe,
Amravati.
================================================================
निर्मल बाबावर "कृपा"
भोळ्याभाबड्या लोकांकडून पैसे उकळणाऱ्या व स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचा दावा करणाऱ्या निर्मल बाबाने आपली वार्षिक संपत्ती २३५ कोटी (म्हणजे अंकांत रु. २३५०००००००) एवढी दाखविली आहे. लोकांवर कृपा (?) करणाऱ्या आजच्या या तथाकथित संतावर पैशांची चांगलीच "कृपा" झालेली दिसतेय. काही न्यूज चॅनेल्सच्या पुढाकाराने निर्मल बाबावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. चांगले सुशिक्षित (किंबहुना "फक्त साक्षर") लोकही या निर्मल बाबाच्या जाळ्यात फसत आहेत. भाविकांच्या प्रश्नांवर मुर्खासारखी उत्तरे देणाऱ्या निर्मल बाबाचा लोक उदोउदो का करतात ते कळायला मार्ग नाही. साध्यासुध्या माणसालाही कळेल, इतकी मुर्खासारखी उत्तरे देतो. देवाच्या दानपेटीत १० रुपयाच्या ऐवजी १०० रुपये टाकली तर देवाची कृपा होईल, असे उत्तर देणाऱ्या निर्मल बाबाला चॅनेल्सवाले तासनतास प्रसिद्धी देत असतात. चॅनेल्सवाल्यांनी आपल्या सामाजिक जबाबदारीचे थोडेतरी भान राखायला हवे.
• विश्वजीत दीपक गुडधे,
अमरावती.
================================================================
सत्यमेव जयते : भाग १ : स्त्री भृणहत्या
आमीर खानने सत्यमेव जयते हा कार्यक्रम चालू करून फार मोठे कार्य केले आहे. देशाला विळखा घातलेल्या समस्यांवर कोणताही आक्राळेस्तपणा न करता आमीरने प्रबोधनाचे कार्य हाती घेतले आहे. सुरुवातीच्या आपल्या मनोगतातच त्याने त्याचा हेतू स्पष्ट केला. पहिल्या भागाचा विषय होता स्त्री-भृणहत्या. आमीर व त्याच्या टीमने अत्यंत अभ्यासपूर्ण असे संशोधन करून सर्वांना विचार करण्यास प्रवृत्त केले. अमिषा याग्निक, परवीन खान, मीतू खुराना या महिलांनी अनेक संकटांना तोंड देत आपल्या मुलींना कसा जन्म दिला याची कहाणी त्यांच्या तोंडून ऐकताना सर्वांचेच डोळे पाणावले. सासरच्यांनी त्यांना त्रास देऊनही त्यांनी खंबीरपणे आपली वाट कशी निवडली, ही गोष्ट अनेकांना प्रेरणा देऊन गेली. १९९१ पासून आजपर्यंत मुलींच्या संख्येत प्रचंड घट झाली आहे. गेल्या ३०-४० वर्षांत सुमारे ३ करोड मुलींची गर्भातच हत्या करण्यात आल्याची धक्कादायक बाब या निष्कर्षातून समोर आली. संपूर्ण भारतालाच या समस्येने वेधले आहे. ग्रामीण व अशिक्षित लोक असे करतात, हा लोकांचा रूढ समजही या संशोधनाने खोडून काढला. आय.ए.एस. अधिकारी, सी.ए., आरोग्य विभागाचे अधिकारी, डॉक्टर्स, प्राध्यापक, मोठमोठे पॅकेज घेऊन कंपन्यांत काम करणारे यांसारखे तथाकथित सुशिक्षित लोक यात अग्रेसर असल्याचे दिसून आले. असे असतानाही आदिवासी लोक मात्र या सुशिक्षितांपेक्षा समजदार निघाले. डॉ. बेदी यांनी या समस्येचा मुळापासून शोध घेतला. केनियाने या समस्येला कसे नष्ट केले ते बेदींनी सांगितले. अशातच मीना शर्मा व श्रीपाल शक्तावत या राजस्थानच्या दोन धाडसी पत्रकारांनी केलेल्या स्टिंग ऑपरेशनमधून धक्कादायक माहिती समोर आली. विविध वाहिन्यांवर ही क्लिपिंग दाखविल्या गेली ; परंतु व्यर्थ. त्यांनी रंगेहाथ पकडलेले डॉक्टर्स आजही सराईतपणे हा धंदा करत आहेत. मुलींना यमुनेत फेकून द्या, असे म्हण्यासही हे डॉक्टर्स धजावत नाहीत. याकरिता आमीर खान लोकांचे समर्थन घेऊन राजस्थान सरकारला पत्र लिहणार आहे. एरवी कचराकुंडीत जाणारे हे पत्र लोकांच्या पाठिंब्यामुळे नक्कीच यश मिळवून देईल. यापुढील भीषण समस्येचीही जाणीव आमिरने करून दिली. विविध सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांच्या परिसरातील परिस्थिती विशद केली. पंजाबमधील नवाशहर येथील परिवर्तनाने लोकांमध्ये नवी आशा निर्माण केली. आपण मनावर घेतले तर नक्कीच ही परिस्थिती बदलू शकतो. आमीर व त्याच्या टीमला या कार्यासाठी सलाम व अनंत शुभेच्छा !!!
• विश्वजीत दीपक गुडधे,
अमरावती.
================================================================
लोकमतमध्ये सचिनबाबतचा लेख वाचला. झटपट यश मिळवण्याच्या धुंदीत स्वतःच्याच पायावर धोंडा मारून घेणाऱ्या लोकांनी सचिनपासून बोध घ्यायला हवा. यशाला कोणताच शॉर्टकट नसतो हे सचिनने सिद्ध केले आहे. अथक परिश्रम घेऊनच तो इथपर्यंत पोचलेला आहे. तेही क्रीडा क्षेत्रातील कोणतीही पार्श्वभूमी नसताना ! स्वतःच्या बळावर त्याने हे सर्व केले आहे. त्याचे कष्ट तसूभरही कमी झालेले नाहीत. आजही तो तासनतास नेट्समध्ये सराव करतो. इतके यश मिळवूनही त्याच्यात कमालीची नम्रता आहे. ना गर्वाची छटा, ना कोणता उद्दामपणा. त्याचे सामाजिक कार्यही तेवढेच वाखाणण्याजोगे आहे. अपनालय या संस्थेतील अनाथ मुलांच्या पालनपोषणाची जबाबदारी त्याने आपल्या खांद्यांवर घेतली आहे. अशा या विक्रमादित्याला माझा सलाम !!!
• विश्वजीत दीपक गुडधे,
अमरावती.
================================================================
वृद्धांना आधार हवा !
दि. २५/९/२०११ च्या मंथन पुरवणीतील “अडगळही, देवघरही…” हा गजानन जानभोर यांचा आणि “वृद्ध नव्हे, ज्येष्ठ!” हा नीलिमा बोरवणकर यांचा लेख वाचला. खेडे आणि शहरातील वृद्धांच्या सद्यस्थितीचे दोघांनीही अत्यंत मार्मिकपणे वर्णन केले आहे. आयुष्यभर काबाडकष्ट करून, स्वतःच्या इच्छा मारून, आपल्या पोटाला चिमटा काढून, प्रसंगी उपशीही राहून आपल्या अपत्यांचे पालनपोषण करणार्यांच्या आयुष्याच्या संध्याकाळी मात्र त्यांची मुले त्यांची साथ सोडतात. यावेळी जेव्हा त्यांना आपया इच्छा पूर्ण करण्याची इच्छा होते तेव्हा त्यांची मुले आपली जबाबदारी झटकून टाकतात. नाइलाजाने त्यांना वृद्धाश्रमाचा आधार घ्यावा लागतो. काही जणांची अशी समजूत आहे की त्यांना गरजेपुरते पैसे दिले की आपले काम संपले! त्यांनी आयुष्यभर केलेल्या कष्टांचे यांच्या नजरेत काहीही मोल नसते. काही तर असेही म्हणतात की ते त्यांचे कर्तव्यच होते.
या समस्येवर सर्वात महत्वाचा उपाय म्हणजे पाल्यांना त्यांची जबाबदारी कळली पाहिजे. त्यांच्यामध्ये जागृती होणे आवश्यक आहे. कायद्याने वृद्धांचा सांभाळ करणे बंधनकारक केले असले तरी त्याचे पालन होताना दिसत नाही. केवळ कायदे बनवून चालणार नाही तर त्याची कडक अंमलबजावणीही झाली पाहिजे. कठोर शिक्षेचीही निकड आहे. ज्येष्ठ नागरिक मंडळासारख्या संस्थांनी पुढे येणे गरजेचे आहे. एकंदर पाहता समाजजागृती हाच या समस्येवर रामबाण इलाज आहे.
• विश्वजीत दीपक गुडधे,
अमरावती.
================================================================




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा