अनुवाद


[ "ओ माय गॉड" या अक्षय कुमार आणि सोनाक्षी सिन्हा यांच्या चित्रपटातील "मेरे निशान" या गाण्याचा स्वैर अनुवाद... 
गीतकार : कुमार 
गायक : कैलाश खेर 
गाण्याची लिंक : http://www.youtube.com/watch?v=a1mpK2LA9Rw ]

माझ्या पाऊलखुणा

(देवाचे मनोगत)


माझी वस्ती तर नाही या माणसांत 
मी तर विकल्या जातो या दुकानांत

विश्व निर्मिले मी हातांनी 

मातीने नाही भावनांनी
भटकतोय मी शोधत...

माझ्या पाऊलखुणा आहेत कुठे ?
माझ्या पाऊलखुणा आहेत कुठे ?

तुझीच छाया होवून राहिलो मी तुझ्यासंगे
उन्हात सावली होवून राहिलो मी तुझ्यासंगे

वाटेवर चालताना जरी मी राहिलो तुझ्या सख्यासारखा
गुरफटला आहेस तरी तू जाळ्यांमध्ये
प्रश्न शोधतो आहेस तू उत्तरांमध्ये
हरवला आहेस तू कुठे ?

माझ्या पाऊलखुणा आहेत कुठे ?
माझ्या पाऊलखुणा आहेत कुठे ?

माझ्यातूनच आले हे पक्षी, हे वाहते पाणी
भूमीपासून अंबरापर्यंत माझीच कहाणी

तू सुद्धा आहे माझ्यातून आलेला
तरी शोधतो तू का इथे मला ?
माझ्यातूनच आले आहे प्रारब्ध
श्वासांनी भरलेले आहे हे चित्र
तरी का आहेस तू निरुत्तर ?

माझ्या पाऊलखुणा आहेत कुठे ?
माझ्या पाऊलखुणा आहेत कुठे ?


 विश्वजीत दीपक गुडधे,
अमरावती.
---------------------------------------------------



युद्धविराम


रक्त आपले असो किंवा त्यांचे,
ते मानवी रक्तच असते शेवटी.
युद्ध पूर्वेत चालू असो व पश्चिमेत,
गळा शांततेचाच घोटला जातो शेवटी. 

बॉम्ब घरांवर पडो अथवा सीमेवर,
जीवनाचा आत्माच जखमी होतो शेवटी.
पीक आपले जळो किंवा त्यांचे,
दुष्काळाने माणूसच मारला जातो शेवटी.

रणगाडे पुढे वळतील किंवा मागे,
वांझ तर पृथ्वीच होते शेवटी.
तो विजयाचा जल्लोष असो वा पराभवाचा शोक,
जीवन मृत्यूवर अश्रूच गाळते शेवटी. 

युद्ध तर स्वतःच आहे एक समस्या,
मग ते कसे होईल समस्यांवरील उपाय.
संगे घेऊन येते आग आणि रक्त,
मागे सोडून जाते फक्त विनाश आणि विनाश.

 विश्वजीत दीपक गुडधे,
अमरावती.
---------------------------------------------------




( जफर गोरखपुरी यांच्या "तो मुझे खत लिखना" या रचनेचा स्वैर भावानुवाद )


पत्र लिहशील मला



छळेल माझी याद जेव्हा, पत्र लिहशील मला 
उडेल तुझी झोप जेव्हा, पत्र लिहशील मला 

नील तरूंच्या निबिड छायेतला हसरा श्रावण 
तृषित अवनीला कवेत घेण्या आतुरलेला श्रावण
अख्खी रात्र छतावरती अखंड बरसणारा श्रावण 
हृदयी जेव्हा भडकेल ज्वाला, पत्र लिहशील मला 

अवचित एखाद्या फांदीवरचे पान फडफडेल 
सहवासातील एखादा क्षण तुला गुद्गुदेल 
आठवनौका माझी तुजला व्याकूळ करेल 
जीवास आग लागेल जेव्हा, पत्र लिहशील मला

पाहण्यालायक जेव्हा नसेल काही नजरेला 
चंद्रही जाईल जेव्हा मेघांच्या आडोशाला 
स्वजन होती परके जेव्हा, पत्र लिहशील मला 

• विश्वजीत दीपक गुडधे,
  अमरावती.

--------------------------------------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा