माझी मुलाखत

"बेम्भाटे मास्तरांची शाळा" या फेसबुक समूहावरील माझी मुलाखत
================================================

माझा परिचय आणि सूत्रसंचालन : 

सौ. रश्मी जांभेकर 

श्री. शशांक गोळेगावकर

लिटील चॅम्प ऑफ अवर बी.एम.एस....विश्वजित...

-------------------------------------------------------------------------------------------------

Dream is not what you see in sleep, dream is the thing which does not let you sleep. हे लहान वयातच एवढी प्रगल्भता दाखवणारा हरहुन्नरी हा बाल अवलिया...

मित्र हो...आपल्या शाळेतील सर्वात लहान हुशार आणि अगदी कुमारवयातच विविध क्षेत्रात आपल्या आगळ्या वेगळ्या चातुर्याने विविध शिखरे पादाक्रांत करणाऱ्या एका "मूर्ती लहान पण कीर्ती महान" असण्याऱ्या विश्वजीतला आपण जाणून घेणार आहोत.

विश्वजीत दीपक गुडधे ह्याचा जन्म ३ ओगस्ट रोजी अमरावती येथे झाला.मणिबाई गुजराती हायस्कूल, अमरावती येथे १० वी पर्यंत शिक्षण "सेमी इंग्रजी" माध्यमातून झाले असून यंदा तो ११वीत श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय, अमरावती येथे विज्ञान शाखेत संगणक शास्त्र शिकत आहे..विश्वजीत ची आई सौ सुषमा दीपक गुडधे या एम.ए.विथ इकॉनॉमिक्स असून त्यांनी आय.टी.आय. चा डिप्लोमा हेयर एंड स्कीन केयर मध्ये केला असून सध्या त्या अमरावतीचा आय.टी.आय. कॉलेज मध्ये इंस्ट्रक्टर म्हणून काम करत आहे,.वडील श्री दीपक गुडधे ह्यांचा बिजनेस आहे. लहान भाऊ आठवीत शिकत आहे. "सेरेब्रल पाल्सी" ह्या आजाराने ग्रस्त असलेला "जीत' ह्या आजारालाही धीराने झुंज देत आहे..जन्मताच पाठी लागलेला हा दुर्धर आजार आणि त्याला सामोरे जाण्याचे सामर्थ्य हे नक्कीच वाखाणण्याजोगे आहे. डॉ. मुरके ह्यांच्याकडे जन्मापासून सुरु झालेली ट्रिटमेंट आजतागायत सुरु आहे. बालवाडी ते चौथीपर्यंत त्याला आधार शिवाय बसता येत नसे कारण पाठीत बाक होता. पण बालवाडी ते चौथी पर्यंतचे शिक्षक मोलाचे सहकार्य करणारे होते. त्याला शाळेत प्रवेश घेतानाही बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागले, बऱ्याच शाळांनी डिसेबलीटीमुळे प्रवेश नाकारले आणि म्हणून त्याला शाळेत पण एक वर्ष उशिरा दाखल व्हावे लागले.पण जन्मताच तल्लख बुद्धिमता असलेल्या चॅम्पने नर्सरी नंतर डायरेक्ट पहिली इयत्तेत उडी टाकली.लहानपणापासून कुशाग्र बुद्धी आणि मिलेले ते आव्हान पेलायचे सामर्थ्य ह्याच वयात सुरु झाले असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही..ज्या शाळेत विश्वजीत १० वी पर्यंत शिकला त्या शाळेचे ऋण फेडता येणार नाही असे सुषमाताई आवर्जून नमूद करतात कारण दर वर्षी विश्वजीत साठी त्यांना वर्ग तळमजल्यावर ठेवावा लागत असे..शिवाय स्टाफ रूम आणि स्टाफ टोयलेट मध्ये त्याला बिनदिक्कत जायची मुभा होती..अगदी परीक्षा असो किंवा कोणतीही स्पर्धा त्याचे शिक्षक शाळेतील मान्यवर,सेवक व्हील चेअर घेऊन मेन गेट पर्यंत जात असत.हे आमचे अहोभाग्यच त्यामुळे त्याचा यशात शाळेतील सर्व लोकांचा सिंहाचा वाटा आहे ..

असा हा आपला लहान वयातच उत्तम लेखन करण्याचे बाळकडू आणि प्रेरणा त्याला आपले आजोबा (आईचे वडील) ह्यांच्या कडून मिळाली..हे लेखनाचे बीजांकुर लहानपणी रोवले गेले ते आता वटवृक्षाप्रमाणे बहरले आहे..मग ते लिखाण गझल असो,कविता असो या ललित लेख,व्यक्ती चित्रण.,कथा, चारोळी,अनुवाद सारख्या विविधांगी प्रकारातही...आपला हा "जीत"त्यातही बाजी जिंकून जातो......आणि म्हणूनच त्याची हि वेगळीच "गझल : कधी कधी " मध्ये उमटलेले भाव आपल्याला बरेच काही सांगून जातात...

(गझल)
कधी कधी

वाटे मनास तैसे करतो कधी कधी
नेईल वाट तिकडे वळतो कधी कधी

वर्षाव हा सुखांचा ना भावतो मला
दुःखांतही अता मी रमतो कधी कधी

इतरांचं दुःख देई पीडा मला बहुत
मी हास्य दुःखितांचे बनतो कधी कधी

कामास ना मिळे येथे दाम नेहमी
श्रमिकच इथे उपाशी मरतो कधी कधी

विश्वात या हरेकाची वेगळी तऱ्हा
हा खेळ बाहुल्यांचा बघतो कधी कधी

• विश्वजीत दीपक गुडधे,
अमरावती.

किंवा हा अनुवाद असो..

( जफर गोरखपुरी यांच्या "तो मुझे खत लिखना" या रचनेचा स्वैर भावानुवाद )
पत्र लिहशील मला

छळेल माझी याद जेव्हा, पत्र लिहशील मला
उडेल तुझी झोप जेव्हा, पत्र लिहशील मला

नील तरूंच्या निबिड छायेतला हसरा श्रावण
तृषित अवनीला कवेत घेण्या आतुरलेला श्रावण
अख्खी रात्र छतावरती अखंड बरसणारा श्रावण
हृदयी जेव्हा भडकेल ज्वाला, पत्र लिहशील मला

अवचित एखाद्या फांदीवरचे पान फडफडेल
सहवासातील एखादा क्षण तुला गुद्गुदेल
आठवनौका माझी तुजला व्याकूळ करेल
जीवास आग लागेल जेव्हा, पत्र लिहशील मला

पाहण्यालायक जेव्हा नसेल काही नजरेला
चंद्रही जाईल जेव्हा मेघांच्या आडोशाला
स्वजन होती परके जेव्हा, पत्र लिहशील मला

• विश्वजीत दीपक गुडधे,
अमरावती.

किंवा हि आगळीवेगळी त्याचे बालमन दर्शविणारी कविता असो...(बालकविता)

मनासारखे झाले तर...

मनासारखे झाले तर
किती किती मजा येईल
मनाला वाटेल ते सारे
प्रत्यक्ष करता येईल

रंगीबेरंगी पक्ष्यांसंगे
आकाशी भरारी घेणार
लुकलुकणाऱ्या ताऱ्यांच्या
जगाची सैर करणार

माझ्या प्रिय चांदोमामाची
एकदा घेईल मी भेट
तेजाचे रहस्य जाणण्या
जाईल सुर्यापाशी थेट

स्वप्नातल्या परीकडून
मी जादूची छडी घेईल
तो गोलगोल फिरवून
सर्व इच्छा पूर्ण करील

'मनासारखे झाले तर'
कल्पनेने मी आनंदतो
मनासारखे व्हावे अशी
नेहमी आशा बाळगतो

• विश्वजीत दीपक गुडधे,
अमरावती.

किंवा लहान वयातच शेतकऱ्यांची व्यथा दाखवणारी हि प्रगल्भ कविता असो..

शेतकऱ्याची व्यथा

आम्हा शेतकऱ्यांवरी
सदा रुसला पाऊस
कसा पिकवू कापूस
पाण्याविना ||१||

कष्ट करून करून
झाली या हाडांची झीज
कधी होईल हो चीज
प्रयत्नांचे ||२||

वावरात गाळतो मी
माझ्या रक्ताचाही घाम
कधी मिळणार दाम
श्रमांना या ||३||

लेक शिकावी म्हणून
घर ठेवलं गहाण
नाही पायात वहाण
कधी माझ्या ||४||

आम्हासाठीच्या योजना
नेत्यांच्या पोटात जाई
माझे पोट मात्र राही
उपाशीच ||५||

कधी होईल माझी या
दुःखांपासून सुटका
मिळेल दोन घटका
सुख थोडे ||६||

• विश्वजीत दीपक गुडधे,
अमरावती.
------------------------------------------------------

असे विश्वजीत चे विविधांगी लेखन

हिंदुस्थान
देशोन्नती
जनमाध्यम
मातृभूमी
वृत्त केसरी
विदर्भ मतदार
सकाळ
अमरावती दर्शन
अमरावती इविनिंग
प्रतिदिन अखबार
The Hitavada
लोकमत समाचार
लोकशाही वार्ता
साप्ताहिक हिंद हिमालय
तरुण भारत
अमरावती मंडल
.......ह्या वृत्तपत्रांमधून प्रकाशित झाले आहे.

आपल्या ह्या बालकलाकाराचे आवडते व्यक्तिमत्व ---:- महात्मा गांधी, राणी लक्ष्मीबाई, शिवाजी महाराज, रवींद्रनाथ टागोर, वि.दा.सावरकर, सुभाषचंद्र बोस, चंद्रशेखर आझाद, भगतसिंह, इत्यादी...

आपल्या जीतचे आवडते कवी लेखक ---:- सुरेश भट, उत्तम कांबळे, ज्ञानेश वाकुडकर, चंद्रशेखर धर्माधिकारी, विंदा करंदीकर
--------------------------------------------------------------


नवनाथ पवार यांचे मनोगत :

विश्वजीतला मी फेसबुकवर वर्षभारापेक्षाही जास्त काळापासून पाहतो. पण आंबेजोगाई संमेलनात प्रत्यक्ष भेट होई पर्यंत मला कधीही असे जाणवले नव्हते कि त्याचे जीवन इतके संघर्षमय असेल. कारण त्याने सतत आपल्या गुणांचे, आणि प्रगल्भ प्रतिभेचेच प्रदर्शन केले. आणि जे दिले ते सर्वोच्च दिले. त्यात अगदी कणभरही निराशा, आपल्या भोगा बद्दलची तक्रार किंवा सहानुभूतीसाठी त्याचे प्रदर्शन नव्हते. अनेकदा तर तो खरेच लहानगा विद्यार्थी आहे कि , कोणी वयस्क आहे अशी शंका यावी इतपत परिपक्व साहित्य त्याचे दिसून येई. त्यामुळे आंबेजोगाई संमेलनाआधी सुषमाताई (त्याच्या आई ), जेव्हा त्याचा शारीरिक मर्यादेबद्द्ल फोनवर बोलल्या तेव्हा माझा विश्वासच बसेना. कारण आजपर्यंत मी अनुभवलेल्या विश्वजीतच्या एकूण एक पोस्ट आणि कॉमेंट अत्यंत उच्च दर्जाची इच्छाशक्ती दाखवणाऱ्या होत्या..... आणि विषयाचे वैविध्य, लिखाणाचा दर्जा कुठेही तडजोड नाही. अस्सल गुणवत्तेचे बीज असेल तर उरावरच्या तीन चार इंचाच्या मातीच्या ढेकळाला कापून ते तरारून वर येते. विश्जीतचची इच्छाशक्ती अशीच विराट आहे. एक सोळा वर्षाचा लहानगा इतके प्रतिभेचे प्रयोग करतो हेच मुळी एक नवल आणि त्यात सकस गुणवत्ता सापडणे म्हणजे सुवर्ण आणि परिमळ...... हे दुर्लभ जी दातारा ... या संत नामदेव यांच्या अभंगाची आठवण यावी. धडधाकट असूनही केवळ इच्छाशक्तीचा अभाव असलेले रडत राउत आम्हाला फेसबुकवर अनेकदा भेटत असतात. त्यांना प्रेरणा द्यायला मी त्यांना विश्वजितचे उदाहरण सांगत असतो. छोट्या छोट्या कारणांनी निराश होणारे, चीडचीड निराशा व्यक्त करणारे मित्र पहिले कि मला लगेच आठवतो आपला विश्वजित. त्याने आपल्या आयुष्यातील तक्रार नावाचा कोंदट अंधारा कोपराच पाडून टाकलाय. तिथे त्याने बनवलीय एक सुंदरशी खिडकी.... जिच्यात डोकावून विश्वजित जगाला कसे जगायचे याचे प्रात्यक्षिक दाखवत असतो. जागेवर बसून सारे जग पायापाशी बोलावण्याची ताकद विश्वजीतच्या जीवनदृष्टीत आहे.

लोकास आता जागवा पुन्हा, विझल्या मशाली पेटवा पुन्हा ....

अनुत्तीर्ण झाले परीक्षेत जीवनाच्या , परी त्यांना मिळाली टक्केवारी होती ....

संकटांना तोंड द्यावे, सदा हसत हसत, नका बसू रे कोसत, नशिबाला ......

अशा एकापेक्षा एक सकस कविता लिहिणारा, कवितांना तेवढीच आशयघन चित्रे रेखाटून देणारा विश्वजित हा एक वेगळाच आजूबा आहे. कोण म्हणेल तो विकलांग आहे.उलट आमच्यातल्या मनोविकालांग मित्रानी त्याचे शिष्यत्व पत्करावे. या विश्वविजयी होण्याची जिद्द बाळगणाऱ्या सिकंदरला मुलाखती द्वारे जाणून घ्यायचा योग येतोय याचा मला अपूर्व आनंद आहे.
----------------------------------------------------------------------------


विवेक जोजारे यांची कविता :

(विवेक जोजारे सर यांनी विश्वजीतवर एक अत्यंत सुंदर कविता सादर केली आहे.)

अंबेजोगाई ची भेट .....
विश्वजित शी थेट ........
मूर्ती लहान असेलही .....
पण लेखणी त्याची ग्रेट ...!!

फेसबुक वरचा ...
हा आधुनिक ज्ञानेश्वर ....
शब्दात ज्याच्या सदा ईश्वर ....
मला मिळाला पहावया ..!!

चेहरा अगदी शांत ....
सदा स्मितहास्य ....
सार्यांशी विनयी भाष्य ....
विश्वजीताचे ..!!

सुस्वभावी ,सहज शब्दांनी ....
आम्हा जिंकणारा .....
परिस्थिती विपरीत जरी .....
तो हसत पेलणारा .....!!

खरा विश्वजित .....
शब्दांचा मित .....
माझे विवेकी गीत ...
समर्पित .....
त्याला .....!!

............. विवेक जोजारे .............
----------------------------------------------------------------------------
अश्या ह्या अवलिया विश्वजीतची काही ठळक वैशिष्ट्ये ---

*** दहावीत ९४ टक्के गुण *** 
*** "ऋतू शब्दांचे" या काव्यसंग्रहात ५ कवितांचा समावेश *** 

*** वृत्तपत्रीय लेखन *** 
पुढील वृत्तपत्रांमधून लेखन प्रकाशित - लोकमत, हिंदुस्थान, देशोन्नती, जनमाध्यम, मातृभूमी, वृत्त केसरी, विदर्भ मतदार, सकाळ, अमरावती दर्शन, अमरावती इविनिंग, प्रतिदिन अखबार, The Hitavada, लोकमत समाचार, लोकशाही वार्ता, साप्ताहिक हिंद हिमालय, तरुण भारत, अमरावती मंडल

*** पुरस्कार *** 

*** बाल गौरव अवार्ड २०११ (लोकमत वृत्तसमुहातर्फे अष्टपैलू व्यक्तीमत्वाबद्द्ल) *** 

*** तिसऱ्या शब्द साहित्य संमेलनात माजी कुलगुरू डॉ. कमल सिंह यांच्याहस्ते सत्कार व मान्यवरांसोबत काव्यवाचनाचा योग *** 

*** डॉ. अविनाश सावजी यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या "लिटील चॅम्प" या कार्यक्रमात लिटील चॅम्प म्हणून सहभाग (महाराष्ट्रातून बोलावण्यात आलेल्या निवडक ५-६ लिटील चॅम्प मध्ये समावेश) *** 

*** बुद्धिबळ स्पर्धा व सामान्यज्ञान स्पर्धा *** 
यांत विविध पारितोषिके [ बुद्धिबळ स्पर्धा आणि सामान्यज्ञान स्पर्धा यांत बक्षीस म्हणून मिळालेली एकूण रक्कम रु. २७००]

*** अबॅकस *** 
(राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धेत द्वितीय पारितोषिक)

*** फेसबुकवरील "माय लव्ह अमरावती" या ग्रुपच्या सदस्यांतर्फे सत्कार *** 

----------------------------------------------------------------------------
स्वागतकर्ता : श्री. शशांक गोळेगावकर 



मित्रहो .. आपल्या शाळेचा सर्वात लहान विद्यार्थी .. मूर्ती लहान पण कीर्ती महान .. विश्वजित .. यास आपण जाणून घेणार आहोत. विश्वजीतच्या शिरपेचात हा अजून एक मानाचा तुरा आज लागणार आहे. विश्वजित आता शाळेत उपस्थित झाला असून मी आपल्या सर्वांतर्फे त्याचे स्वागत करतो .. स्वागत आहे विश्वजीत दीपक गुडधे...
----------------------------------------------------------------------------

मुलाखत प्रश्नोत्तरे
===============

१. फेसबुके


१) तुला लिखाणाचे बाळकडू कुणाकडून मिळाले ?

मला लिखाणाची प्रेरणा माझ्या आजोबांकडून (आईचे वडील) मिळाली...

अशी झाली लिखाणास सुरुवात :-
२६ जानेवारी २०१० चा तो दिवस होता. प्रजासत्ताक दिवस असल्याने कायम स्मरणात आहे. मी असाच वर्तमानपत्र वाचत होतो. शेजारी माझी आई होती. माझी आई मला म्हणाली की, लेख लिहणे फार कठीण असते. आजोबा गत १५ वर्षांपासून लेखन करीत आहेत. तोवर मला हेसुद्धा माहित नव्हते की माझे आजोबा लेखन करतात. तेव्हा मी सुद्धा प्रयत्न करून बघायचे ठरविले आणि "...तरच २०२० मध्ये भारत महासत्ता बनेल" हा एक छोटासा लेख लिहिला. तो आजोबांना दाखविला. त्यांना तो आवडला आणि त्यांनी तो वृत्तपत्रांमध्ये दिला. ६-७ वृत्तपत्रांमध्ये तो छापून आला. मग आणखी काही लेख लिहिले. तेसुद्धा छापून आले. नंतर लिखाणाची गोडीच लागली. मग लेखांसोबतच मी कविता, कथा आणि नंतर गझल असे साहित्यप्रकार हाताळायला सुरुवात केली. मी लेख द्यायचो आणि आजोबा वर्तमानपत्रांमध्ये पोचवून द्यायचे. छापून आल्यावर विकत आणायचे. एखाद्या वेळी आजोबा बाहेरगावी गेल्यास मी स्वतः एखाद्याबरोबर जाऊन लेख पोचवून द्यायचो. आता इंटरनेट असल्याने लेख/कविता अनेकदा ई-मेल नेच पाठवितो. बरेचदा माझे आणि आजोबांचे लेख एकमेकांच्या शेजारीच छापून आले आहेत.

या उत्तरावरील मान्यवरांच्या प्रतिक्रिया :


शशांक गोळेगावकर :- वाव .. म्हणजे लिखाणाचे बाळकडू घरातच मिळाले .. ब्रावो.

-------------------------------------------------------------------------------------------------------------------

२) तुझे आदर्श कोणते ?

तसे तर देशासाठी आपला सर्वस्वी त्याग करणारे सर्वच देशभक्त माझ्यासाठी प्रेरणादायी आहेत. तरीसुद्धा मी महात्मा गांधी, शिवाजी महाराज, राणी लक्ष्मीबाई यांचा विशेषत्वाने उल्लेख करेल. गांधीजींची अहिंसा, शिवाजी महाराजांची प्रशासन पद्धती आणि राणी लक्ष्मीबाईचे शौर्य आणि त्याग यांमुळे मला प्रेरणा मिळते. म्हणून मी त्यांना माझे आदर्श मानतो.

या उत्तरावरील मान्यवरांच्या प्रतिक्रिया :


स्वाती धर्माधिकारी :- क्या बात है सहीच विश्वजीत...चालू दे चौफेर बॅटिंग 


रश्मी जांभेकर :- विशू मस्त...नाईस आनसर 
-------------------------------------------------------------------------------------------------------------------

३) सर्वात आवडता लेखक / कवी कोण आणि का ?

( तसे तर मला अजून बरेच काही वाचायचे आहे. तरी मी जे थोडेफार वाचले आहे त्यातील सांगतो )

चंद्रशेखर धर्माधिकारी, उत्तम कांबळे, सुरेश भट, बहिणाबाई चौधरी, ज्ञानेश वाकुडकर, संत ज्ञानेश्वर, विंदा करंदीकर.

कारण असे की, हे जे काही लिहितात ते थेट काळजाला भिडणारे असते.

या उत्तरावरील मान्यवरांच्या प्रतिक्रिया :


फेस बुके :- छान



रश्मी जांभेकर :- व्वा विश्वजीत तुझे हे ही उत्तर आमच्या काळजाला भिडले...मस्त ब्रावो चॅम्प
-------------------------------------------------------------------------------------------------------------------

४) तुला इतक्या कमी वयात फेसबुकवर कुणी आणले ?

साधारणतः दीड वर्षांपूर्वी, एका हिंदी न्यूज चॅनेलवर फेसबुकबद्दल चर्चा चालू होती. त्यात दोन्ही बाजूने मुद्दे मांडले जात होते. काहींनी त्याच्या दुरूपयोगाबद्दल तर काहींनी इराक, इराण सारख्या अरबी राष्ट्रांत फेसबुकद्वारे झालेल्या क्रांतीबद्दल भाष्य केले. "ऑक्युपाय वॉल स्ट्रीट" हे त्याचे ताजे उदाहरण. त्यामुळे त्या चर्चेनंतर फेसबुकद्वारे आपणसुद्धा चांगल्या विचारांचा प्रसार करावा, काही विधायक कार्य करावे या उद्देशाने मी फेसबुकवर खाते उघडले आणि 'भारत सुधार' हा ग्रुप स्थापन केला. त्या माध्यमातून माझे विचार मांडत गेलो. सोबतच माझे लिखाणही टाकू लागलो.


या उत्तरावरील मान्यवरांच्या प्रतिक्रिया :

रश्मी जांभेकर :- क्या बात है विशू..एवढ्या लहान वयात पण तू एवढा मस्त प्रगल्भ विचार केलास, विधायक काम करण्याचा..विश यु ऑल द बेस्ट डिअर  
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

५) भविष्यात कोणते ध्येय उराशी बाळगून आहेस ?

भविष्यात मला आय.ए.एस. होवून लोकांची सेवा करायची आहे.

या उत्तरावरील मान्यवरांच्या प्रतिक्रिया :


रश्मी जांभेकर :- इंडिड अ ग्रेट थिंकिंग..आभाळभर शुभेच्छा बाळा तुला आमच्या सगळ्यांकडून..गॉड ब्लेस यु.  


शशांक गोळेगावकर :- वा छानच .. तुझे वांछित पूर्ण होवो .. ही शुभेच्छा.



फेस बुके :-  तुला तुझ्या ध्येयपूर्तीसाठी मनापासून खूप साऱ्या शुभेच्छा !

-------------------------------------------------------------------------------------------------------------------

२. स्वाती धर्माधिकारी


१) कविता करण्याची पहिली उबळ केव्हा आली व पहिली कविता कोणती ??

एकदा माझ्या मनात विचार चालू होते की, लोक पैशाला अवास्तव महत्व का देतात ? पैसा म्हणजेच सर्वकाही होते का ? मी याबद्दल लिहायचे ठरविले. तेव्हा माझे ६ लेख प्रसिद्ध झालेले होते. यावेळेस कवितेच्या माध्यमातून व्यक्त व्हायचे ठरविले आणि पहिली कविता लिहिली : "पैशापुढे नतमस्तक"...

"पैशापुढे नतमस्तक"

बघा पैशाची ही अजब नशा
जग घालिते लोटांगण हिच्या पाया

पैशापुढे नाती-गोती झाली लहान
मायावी पैसा बनला सर्वात महान

पैसे खाणाऱ्यांची झाली ख्याती
कष्ट करणाऱ्यांची झाली माती

पैसे खाऊन नेतेमंडळी झाली लाल
गोरगरिबांचे मात्र झाले हाल

पैशासाठी झाले कित्येकांचे अपहरण
पैशामुळे आले कित्येकांना मरण

पैशासाठी विश्वासूंनी केला विश्वासघात
पैशाने घडविले भयानक रक्तपात

असे हे मायावी पैसे दुरीतांकरीताच खरे
आपण मात्र यापासून दूर असलेलेच बरे

• विश्वजीत दीपक गुडधे,
अमरावती.

या उत्तरावरील मान्यवरांच्या प्रतिक्रिया :



रश्मी जांभेकर :-क्या बात है जीत...मस्तच कविता..पैशापुढे नतमस्तक....जियो 


शशांक गोळेगावकर :- छान उत्तर. आवडले.

ज्ञानेश वाकुडकर :- विश्वजीत..ऑल द बेस्ट..मी मुंबईत आहे..तुझी मुलाखत वाचतोय..बढीया...लगे रहो...मला आधी माहित नव्हते..मुलाखतीबद्दल...

-------------------------------------------------------------------------------------------------------------------

२) "अपंग "या शब्दाची तुझी व्याख्या काय ?? कारण शरीराने सबळ असून बरेच लोक कामे न करता ही आयते जगत रहातात ...रडत राहतात...

माझ्यामते जे लोक स्वतःमध्ये क्षमता असूनही परिस्थितीशी कधीच संघर्ष करत नाहीत, झुंज देत नाहीत ते 'अपंग' आहेत.

या उत्तरावरील मान्यवरांच्या प्रतिक्रिया :


शशांक गोळेगावकर :-  विश्वजीत...वा .. अपंगत्वाची वास्तविक व्याख्या .. मस्तच.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------

३) आजच्या ऐदी व नको त्या प्रलोभनामागे वाहवत जाणाऱ्या पिढीला कसे शिकवावे म्हणजे ते योग्य मार्गा वर जगतील ?

काही युवांसाठी संपूर्ण पिढीला ऐदी संबोधणे जरा अन्यायकारक होईल असे मला वाटते. कारण बरेच युवक चांगले कार्य करत असल्याचे आपल्याला अनेकदा वर्तमानपत्रांमधून कळते. सर्वात महत्वाचे म्हणजे त्यांच्यावर लहानपणापासून योग्य संस्कार करावे लागतील. त्या संस्कारांप्रमाणे मोठ्यांचेही वर्तन असायला हवे. कारण लहान मुले ही अनुकरणप्रिय असतात. मोठ्यांचे बघून तेही तसेच करतात.

या उत्तरावरील मान्यवरांच्या प्रतिक्रिया :


शशांक गोळेगावकर :- समर्पक उत्तर विश्वजित .. खरे आहे .. सर्वांना एकाच तागडीत मोजणे कदाचित ठीक नाही.




रश्मी जांभेकर :- विश्वजीत...येस अग्रीड..वेल सेड..

-------------------------------------------------------------------------------------------------------------------

४) आपल्या शिक्षण पद्धतीत काय काय बदल सुचवशील...?? आणखीन कोणकोणत्या बाबतीत सरकारी धोरणान मध्ये /सरकारी कामामध्ये बदल हवेसे वाटतात का ?

विद्यार्थ्यांनी शिक्षण घेण्याच्या पद्धतीत बदल करायला हवा. सर्वप्रथम त्यांना हे कळायला हवे की, आपल्याला जीवन हे चांगल्या रीतीने (सद्वर्तनाने) जगता यावे, आयुष्यातील कठीण प्रसंगी मदत व्हावी हा शिक्षण घेण्याचा प्राथमिक उद्देश आहे. नोकरी, पैसा किंवा तत्सम गोष्टी या त्याच्या अनुषंगाने येणाऱ्या दुय्यम बाबी आहेत. त्यामुळे त्यांनी केवळ नोकरी, पैसा या दृष्टीने न बघता ज्ञानार्जनाच्या दृष्टीने बघायला हवे. शिवाय त्यांनी शिक्षणात शिकलेल्या गोष्टींचा त्यांना विसर पडू नये. शिकले एक आणि वागले वेगळेच असे होता कामा नये.

(यावर माझी एक कविता)
"परीक्षा"

म्हणे त्यांच्याकडे बडी हुशारी होती
ती तर पाठांतराची ओकारी होती

कागदावरच त्यांनी फोडल्या डरकाळ्या
पेच येता ती टोळी पळणारी होती

इतिहासात पेटविली क्रांतीची मशाल
संकट येता ; घेतली लाचारी होती

विज्ञानात केलेत अंधश्रद्धांवर वार
त्यांची झुंड तर भोंदूच्या दारी होती

भूगोलात केली त्यांनी जगाची सैर
परि शेजारच्यास न ओळखणारी होती

आयुष्याचे गणित कधी आलेच नाही
तरीपण बरोबर ही गुणाकारी होती (?)

मायभूचे ऋण न जाणले ; झटपट शिकून
त्यांना करायची परदेश वारी होती

सदा शिकले चांगले ; पण वागले उलटच
तरीही त्यांनी घेतली भरारी होती

अनुत्तीर्ण झाले परिक्षेत जीवनाच्या
परि त्यांना मिळाली टक्केवारी होती

• विश्वजीत दीपक गुडधे,
अमरावती.
=====================================

सरकारी धोरणांबद्दल बोलायचे झाल्यास -

• न्यायालयीन प्रक्रियेची गती वाढवायला हवी. कित्येक वर्षे उलटून जातात तरी खटल्यांचा निकाल लागत नाहीत व आरोपी (बहुतांश वेळा अपराधीच) मोकाट फिरतात. शिवाय सशक्त कायद्यांची आवश्यकता आहे.

• जातीच्या आधारावर आरक्षण रद्द करायला हवे. सरकार मतांसाठी याचा दुरुपयोग करत आहे.
आणि सर्वात महत्वाचे म्हणजे चांगल्या लोकांनी राजकारणात यायला हवे. चांगल्या लोकांच्या हाती सत्ता आल्यास अनेक समस्या आपोआप मार्गी लागतील.

-------------------------------------------------------------------------------------------------------------------

३. शशांक गोळेगावकर


) समवयीन मुलांसोबत त्यांच्या सोबत खेळू बागडू शकत नाही ह्याचे वाईट तर नक्कीच वाटत असणार. पण त्यामुळे काही न्यूनगंड वाटतो का ? नसल्यास का नाही ? किंवा पूर्वी वाटत असल्यास तो दूर होण्यास कोणाची आणि कशी मदत झाली.

समवयस्क मुलांसोबत मी क्रिकेट आणि बुद्धिबळ खेळायचो. क्रिकेट खेळताना भिंत किंवा खुर्चीचा आधार घ्यायचो. बहुतांश वेळा जिंकायचो. त्यामुळे खेळताना अधिक मजा यायची.
-------------------------------------------------------------------------------------

२) खेळांची आवड आहे का ? आवडता खेळाडू कोण ?

बुद्धिबळ हा सर्वात माझा आवडता खेळ. त्यात मी विभागीय स्तरांपर्यंत खेळलेलो आहे. शिवाय क्रिकेटही आवडते. बुद्धिबळात विश्वनाथन आनंद तर क्रिकेटमध्ये सचिन तेंदुलकर आवडता खेळाडू.
-------------------------------------------------------------------------------------

३) फेसबुकचा तुझ्या आतापर्यंतच्या वाटचालीत काय सहभाग राहिला आहे. फेसबुक मुळे काही फायदा झाला असे वाटते का ? कोणता ?

फेसबुकमुळे माझे लिखाण दूरवर पोचले. अनेक वाचक मिळाले. असंख्य चांगल्या आणि ज्ञानी व्यक्तींशी माझी ओळख झाली. विचारांचे आदानप्रदान झाले. ज्येष्ठांचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद मिळाले. शिवाय माझ्या कविता पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाल्या, तेही फेसबुकमुळेच.
-------------------------------------------------------------------------------------

४) फेसबुक वरील ग्रुप्स बद्दल एकंदरीत तुझे मत काय आहे ? सृजनशीलता वाढण्यासाठी फेसबुक / ग्रुप्स मदतकारक आहेत असे तुला वाटते का ?

फेसबुकवर विविध समूह आहेत. प्रत्येक ग्रुपचे काही उद्दिष्ट आहे आणि ते पुष्कळ प्रमाणात पूर्ण देखील होत आहेत. कुठे कलेला वाव मिळत आहे, कुठे सामाजिक बांधिलकी जोपासली जात आहे तर कुठे विचारांचे आदानप्रदान होत आहे. त्यामुळे सृजनशीलता वाढण्यासाठी फेसबुक समूह मदतकारक आहेत असे मला वाटते.
-------------------------------------------------------------------------------------

५) आजपर्यंतच्या वाटचालीवर तू समाधानी आहेस का ? काही अजून मिळवायचे राहून गेले असे वाटते का ?

आपण लिहिलेलं लोकांना आवडतं, याचा आनंद आहे. काय मिळविले काय नाही याबद्दल मी कधी विचार केला नाही. आपण फक्त आपले कार्य करत रहायचे, जे काही मिळायचे असेल ते आपोआप पदरात पडत जाईल.
-------------------------------------------------------------------------------------

६) भविष्यासाठी एकंदरीत काय कल्पना / स्वप्न आहेत ? ती पूर्ण होण्यासाठी काय प्रयत्न करीत आहेस ?

माझ्याकडून होईल त्या मार्गाने मला समाजाची सेवा करायची आहे. त्यापैकी आय.ए.एस. हा एक मार्ग आहे लोकसेवेचा. शिवाय लिखाणाच्या माध्यमातून चांगल्या विचारांचा प्रसार करायचा माझा प्रयत्न आहे. आय.ए.एस. करिता मी माझे सामान्यज्ञान वाढवत आहे. शिवाय त्याकरिता आवश्यक असणारी कौशल्ये आत्मसात करण्याचा मी प्रयत्न करत आहे.
-------------------------------------------------------------------------------------

७) तुझ्या सारख्या व समवयीन मुलांना तू काही संदेश देऊ इच्छितोस का ?

माझ्यासारख्या समवयीन मुलांना मी सांगू इच्छितो की, त्यांनी त्यांच्या ज्ञानाचा उपयोग देशाच्या विकासासाठी करायला हवा. परदेशी कंपन्यांची चाकरी करण्यापेक्षा परदेशातील विविध तंत्रज्ञानाचा फायदा आपल्या मातृभूमीला करून द्यावा.

" मायभूचे ऋण न जाणले ; झटपट शिकून
त्यांना करायची परदेश वारी होती"

असे व्हायला नको.
-------------------------------------------------------------------------------------

४. संकेत शेटे

विश्वजीत मित्रा तुला आजवर बरेच बरे वाईट अनुभव आले असतील. लोकांचे तुला "वेगळ्या नजरेने पाहणे " तू आजवर कसे पचवत गेलास ? लहानपणापासून ते आजवर तुझ्या दृष्टीकोनात कसा बदल होत गेला हे जाणून घ्यायला आवडेल .

बहुतांश वेळा चांगलेच अनुभव आलेत. वाईट अनुभव फार थोड्या वेळा आलेत. पण मी त्यांकडे कधीच गांभीर्याने लक्ष दिले नाही. नेहमीच दुर्लक्ष केले. त्यामुळे माझा माझ्या अपंगत्वाकडे बघण्याचा दृष्टीकोन जसा आधी होता तसाच आजही आहे आणि पुढेही तसाच राहील.
-------------------------------------------------------------------------------------
५. ललित दाबाले

विश्वजीत समाजातील कोणकोणत्या गोष्टी/चालीरितीँमुळे तुझा मनस्ताप होतो ?

समाजाची संकटांना झुंज देण्याची क्षमता क्षीण होत चालली आहे. एकीकडे उच्च प्रगती करणारा समाज अंधश्रद्धांच्या जाळ्यात गुरफटला जात आहे. समाज जे काही शिकतो ते आचरणात आणत नाही याचे वाईट वाटते. समाज पैशाला अवास्तव महत्व देऊ लागला आहे. त्यासाठी नाती-गोती, मानवता यांचा त्याला विसर पडला आहे. एकंदरीत समाज हा भोगवादी होत चालला आहे. या सर्व गोष्टींमुळे माझा मनस्ताप होतो.
-------------------------------------------------------------------------------------

६. विवेक जोजारे

१) विश्वजित....पाणी ज्या रंगात मिसळेल त्याच्या रंगासारखच होत ....
परिस्थितीनुसार माणसाचाही रंग बदलतो......
पहिला बदल आपल्याला मान्य तर दुसरा खटकतो....
असा खटकणारा बदल तू कधी अनुभवलास का ..?

असे अनेकदा होत असते. कारण पहिल्या वेळेस आपण ज्या अनुषंगाने विचार करतो त्याच अनुषंगाने आपण दुसऱ्या वेळेसही विचार करूच, असे नाही. त्यामुळे तसे वाटणे साहजिकच आहे. अजून तरी मला असा अनुभव आला नाही. पण भविष्यात मात्र येतील "क्योकी अभी तो पुरी जिंदगी बाकी है"
-------------------------------------------------------------------------------------

२) तू वेगवेगळ्या विषयावर लिहिताना विचारांची गर्दी असते कि सुचत जात आणि तू लिहित जातो अस होत..?

परीस्थितीनिहाय हे बदलत जाते. किंवा लिखाणास घेतलेल्या विषयाशी असणारी आपली एकरूपता हे सर्व ठरविते. कधी-कधी खूप विचार डोक्यात एकत्र येतात. त्यातील योग्य ते वेचून कागदावर उतरवितो. तर कधी-कधी जसजसे सुचत जाते तसतसे लिहित जातो.
-------------------------------------------------------------------------------------

३) बऱ्याचदा कौतुक करणारे औपचारिक वाटतात ....त्यांचा हा औपचारिक पणा ठळक दिसतो चेहऱ्यावर ....अश्या लोक्कांशी कधी गाठ पडली का..?
सुरवातीला लिहिताना बरेचदा म्हणावा तसा प्रतिसाद लाभला नसेल ....त्यावेळी लिहीन अविरत ठेवणारा च खरा समाजशील लेखक /कवी .....असे तुझ्याबाबतीत घडले काय ..?

औपचारिक कौतुक करणारे कुणी भेटल्याचे मला तरी आठवत नाही. उलट मनापासून भरभरून कौतुक करणारेच नेहमी लाभले. त्यांच्यामुळेच लिखाणास गती मिळत गेली.
=====================================
मी केवळ माझे मत, माझ्या भावना व्यक्त करण्यासाठी लिखाणास सुरुवात केली होती. प्रतिसादाची अपेक्षा ठेवली नाही. त्यामुळे लिखाण थांबवावे असे कधीच वाटले नाही. सुरुवातीला लिहिताना नवखा होतो तरी वृत्तपत्रांनी टाळाटाळ केली नाही. संपादकीय पानावर सर्वात पहिले असलेलेही खूप लेख छापून आलेले आहेत.

माझ्या लिखाणास मिळालेली एका सामान्य वाचकाची सर्वात मोठी पावती :-

एके दिवशी माझ्या आईच्या मोबाईलवर माझे अभिनंदन करणारा एका अज्ञात व्यक्तीचा मेसेज आला. त्यात त्याने लिहिले होते की, "परवा मी बसमधून नागपूरला जात असताना माझ्या बाजूच्या सीटवर हिंदुस्थान पेपर पडलेला होता. तसा तर मी कधीच वर्तमानपत्र वाचत नाही. कारण माझा असा समज होता की वर्तमानपत्रात केवळ नकारात्मक बातम्याच असतात. पण मी ते वर्तमानपत्र उघडले आणि तुझा लेख वाचला. तुझे विचार मला पटले आणि खूप आवडले. तेव्हापासून मी आता वर्तमानपत्राचा नियमित वाचक झालो आहे. तुझ्या पुढील लेखाच्या प्रतीक्षेत..."
माझ्या एका लेखामुळे इतके परिवर्तन झाले याचा मला फार आनंद झाला.
-------------------------------------------------------------------------------------

४) विदर्भ अनेक समस्यांच्या विळख्यात आहे ....तुझ्या लेखणीने तिथे आपले म्हणणे मांडलेच असेल ...एखाद्या तरी लोकप्रतिनिधीला याने जाग आली का? तुला लोकप्रतिनिधी भेटतात तेंव्हा त्यांच्या खऱ्या स्वरूपावर लिहिण्याचे नक्कीच सुचले असणार ...अशी एखादी कविता लिहिलीस का ...? देवाने काही हिरावून घेतलं तरी तुझ्यासारखी जिद्दी मानस आपल कर्तुत्व सिद्ध करतात ...तर सर्वांग सुशोभित मानस हि बुद्धी न वापरता परस्थितीला दोषी ठरवतात.. त्यांच्या मानसिक पंगुत्वावर कधी लिहिलेस का ..?

लेखणीने समस्यांना अनेकदा वाचा फोडली. पण गाढ झोपेत असलेल्या असलेल्या लोकप्रतिनिधींना आजपर्यंत जाग आलेली नाही व पुढे येईल की नाही याबद्दल मी साशंकच आहे. नेत्यांच्या वागणुकीवर मी एक कविता लिहिली आहे : "नेता की अभिनेता ?"

"नेता की अभिनेता ?"

लई नाटकी नाटकी
या देशामधला नेता
मतलबापायी होतो
घडीघडी अभिनेता

झोपडीतल्या दीनाची
त्याला येई ना कदर
पण खुर्चीसाठी खातो
गरीबासंगे भाकर

तसे तर खुर्चीदास
सदा एसीतच राहे
पण मतासाठी मात्र
डोईवर भार वाहे

पैशांशीच देणे-घेणे
विकासाला मारी लाता
परि भाषणात त्यांच्या
करी विकासाच्या बाता

आपल्या छाताडावर
उड्या मारती हे मस्त
डोळ्यावरले झापड
काढा, राहू नका सुस्त

• विश्वजीत दीपक गुडधे,
अमरावती.
=====================================

परीस्थितीला दोष देणाऱ्यांना उद्देशून मी ही कविता लिहिली आहे : "जिद्द"

"जिद्द"

सश्यासोबत शर्यतीत
मंदगतीने धावणारा कासव,
अनेकदा पडूनही
भिंतीवर काढणारा किडा,
बल्बचा शोध लावताना
हजारदा चुकणारा एडिसन,
रेल्वे स्टेशनवर वर्तमानपत्रे
विकणारे अब्दुल कलाम,
मोटार गॅरेजमध्ये
नोकरी करणारे गुलजार,
फुटपाथवर सिनेमाची पोस्टर्स
रंगविणारे हुसेन
किंवा
खाटिकखान्यात नोकरी
करणारा शेक्सपिअर...
या सर्वांच्या मुखी
एकच वाक्य होते...
"जिद्द आहे जिंकण्याची"
आणि या जिद्दीनेच
ते झाले यशस्वी...

• विश्वजीत दीपक गुडधे,
अमरावती.
-----------------------------------------------------------------------------
--------


७. हर्षला कलगुटकर

१) हाय विशू....तू कधी देवाला दोष देतोस का ? आपल्या या शाळेत तुला कसे वाटले ? तुला पुढच्या आयुष्यात काय करायचे आहे ? काय बनायचे आहे ?

अजिबात नाही...उलट मी देवाचा आभारी आहे की त्याने मला इतके सुंदर जीवन दिले, इतक्या चांगल्या लोकांचं मला सहवास लाभला.

या समूहावरील सर्व लोक खूपच चांगले आहेत. तुमच्याच भाषेत बोलायचे झाल्यास "लैच वेळा, लैच भारी." बेम्भाटे मास्तरांच्या शाळेने मला खूप काही दिले आहे. पुस्तकरूपाने माझे लेखन प्रसिद्ध करण्याची संधी मला या समूहाने मिळवून दिली.

माझ्याकडून होईल त्या मार्गाने मला समाजाची सेवा करायची आहे. त्यासाठी मी आय.ए.एस. होवून लोकांची सेवा करायचे ठरविले आहे.
-------------------------------------------------------------------------------------

२) नयना चव्हाण - तुला तुझ्या शालेय जीवनात असताना तुला कोणती इच्छा होती जी तू अजूनही पूर्ण करू शकला नाही ? माझ्यावर कितीही मोठं संकट आलं तरी तुला आठवल्यावर मी कधीच नाउमेद होत नाही.

अशी कोणतीही इच्छा नाही. माझ्या शाळेचे मला नेहमीच खूप सहकार्य लाभले. त्याकरिता मी माझ्या शाळेच्या सर्व शिक्षक, कर्मचारी वृंद व मित्रपरिवाराचा शतशः आभारी आहे.
-------------------------------------------------------------------------------------

८. मुकुंद भोकरकर

तुला वाचन आवडते का..? कोणता लेखक आवडतो, तुला कोण-कोणते पुस्तक ( न वाचलेले) वाचायची तीव्र उत्कटता आहे ? तुला हव्या असलेल्या दोन-चार पुस्तकांची नावं सांगू शकशील ?

वाचनाची मला आवड आहे. चंद्रशेखर धर्माधिकारी, उत्तम कांबळे, सुरेश भट, बहिणाबाई चौधरी, ज्ञानेश वाकुडकर, संत ज्ञानेश्वर, विंदा करंदीकर...हे माझे आवडते लेखक/कवी.

श्यामची आई (साने गुरुजी), मधुशाला (हरिवंशराय बच्चन), गीतांजली (रवींद्रनाथ टागोर), माय एक्सपेरीमेंटस विथ ट्रूथ (महात्मा गांधी) ही पुस्तके वाचण्याची माझी खूप इच्छा आहे.
-------------------------------------------------------------------------------------

९. महेंद्र लोमटे

हाय विशू.............तुला जर कोणी जास्तीची सहानुभूती दाखवली तर त्या व्यक्तीचे तुला काय करावासे वाटते ?

मला कोणी जास्तीची सहानुभूती दाखवली असे आतापर्यंत तरी कधी झाले नाही. पुढे असे झालेच तर मी त्याकडे दुर्लक्ष करेल.
-------------------------------------------------------------------------------------
१०. दीपक तारळेकर

विश्वजीत, तुला राग कोणत्या गोष्टींचा येतो ? आणि आला तर तू तो कसा व्यक्त करतो ?

मला राग खूप कमी वेळा येतो. आलाच तर समाजातील वाईट गोष्टींबद्दल येतो. जसे की, भ्रष्टाचार, बालमजुरी, अस्वच्छता, व्यसनाधीनता, अंधश्रद्धा, इत्यादी. तो व्यक्त करण्यासाठी मी लेखणीचा वापर करतो.
-------------------------------------------------------------------------------------

११. नवनाथ पवार

१) विश्वजित, तुझी स्वप्ने कशी असतात ........ एखादे उदाहरण सांगशील ?

माझे असे स्वप्न आहे की, भारताला आज ज्या समस्यांनी विळखा घातला आहे, त्यांपासून भारताची मुक्तता व्हावी. भारतातील प्रत्येक नागरिक त्याच्या परीने एक सुखकर आयुष्य जगला पाहिजे. लोकांमधील कटुता संपुष्टात येवून सर्व लोक सलोख्याने आणि गुण्यागोविंदाने नांदतील, असा भारत मला बघावयाचा आहे.
-------------------------------------------------------------------------------------

२) शैक्षणिक विषयात सर्वात आवडीचा विषय कोणता ? त्यात नेमके काय आवडते ?

तसे तर मला सर्वच विषय आवडतात. पण मला सर्वात जास्त विज्ञान आवडतो. मानवामध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण झाल्यास त्याच्याकडे कोणत्याही गोष्टीवर विचार करण्याची तर्कनिष्ठ बुद्धी येते. सोबतच मला इतिहासही आवडतो. इतिहासात गुलामगिरीत असलेल्या राष्ट्रांनी लढा देऊन विविध जुलमी राजवटींपासून आपली सुटका कशी करवून घेतली, तेथील क्रांतिकारक व विचारवंतांचे उच्च (प्रगल्भ) आणि स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या नीतीमूल्यांची सांगड असणारे विचार जाणता येतात. आपल्याला आपल्यासमोरील परीस्थितींशी सामना करायला या गोष्टी बळ देतात.
-------------------------------------------------------------------------------------

३) विश्वजीतची जीवनातील सर्वोच्च महत्वकांक्षा काय ?

या देशाच्या, येथील जनतेच्या हितासाठी माझे जीवन सर्वतोपरी कामी यावे, ही माझी जीवनातील सर्वोच्च महत्वकांक्षा आहे. या देशातील समस्यांपासून लोकांचं बचाव करण्यासाठी, लोकांना त्यांचा हक्क प्राप्त करून देण्यासाठी देशासमोरील आव्हानांचा सामना करण्यासाठी माझे जीवन कामी यावे असे मला वाटते. मग त्यासाठी आंदोलन करण्याचीही माझी तयारी आहे.
-------------------------------------------------------------------------------------

१२. अभय देशमुख

विश्वजित..............शारीरिक दृष्ट्या काही कमतरता असूनही तुझा आत्मविश्वास नक्कीच कौतुकास्पद आहे पण शारीरिक धडधाकट असणाऱ्या पण मानसिक अपंग (कोत्या विचाराच्या,/नकारात्मक विचार करणाऱ्या )असलेल्या माणसाना पाहून तुला काय वाटते ??? त्यांच्याबद्दल काय सांगशील ??

त्यांच्याबद्दल मला असे वाटते की, त्यांची कष्ट घेण्याची तयारीच नाही आहे. "ठेविले अनंता तैसेची रहावे" या विचारसरणीची ती माणसे आहेत. त्यांच्या बद्दल बहिणाबाई चौधरींच्या "तयास मानव म्हणावे का ?" या कवितेतील ओळी आठवतात..

ज्ञान नाही विद्या नाही
ते घेणेची गोडी नाही
बुद्धी असुनी चालत नाही
तयास मानव म्हणावे का?

दे रे हरी पलंग काही
पशुही असे बोलत नाही
विचार न आचार नाही
तयास मानव म्हणावे का?

पोरे घरात कमी नाहीत
तयांच्या खाण्यासाठीही
ना करी तो उद्योग काही
तयास मानव म्हणावे का?

बाइल काम करीत राही
एतोबा हा खात राही
पशु पक्षात ऐसे नाही
तयास मानव म्हणावे का?
-------------------------------------------------------------------------------------

१३. मोहन वायकोडे

विश्वजित आतापर्यंत तू किती आत्मचरित्र वाचलेत आणि कोणते?

सध्या तरी मी फक्त एकच आत्मचरित्र वाचले आहे. अब्दुल कलाम यांचे "अग्निपंख".
-------------------------------------------------------------------------------------

१४. रावसाहेब बोराडे

विश्वजित, तुझी दृष्टी चौफेर आहे . ध्येय साध्य करण्यासाठी दृष्टी ध्येयकेद्रित असायला हवी. तुला काय वाटते ?

माझे मुख्य ध्येय आहे लोकसेवा. आय.ए.एस. होवून जनसेवा करणे, साहित्याच्या माध्यमातून वैचारिक जागृती निर्माण करणे तसेच लोकांना आनंद देणे, गरजूंना मदत करणे या त्यातील विविध वाटा आहेत. आणि मुख्य म्हणजे मला स्वतःला व्यक्त करणे, माझे विचार मांडणे आवडते म्हणून मी हे सर्व काही करतो.
-------------------------------------------------------------------------------------

मुलाखतीनंतर मान्यवरांच्या प्रतिक्रिया :-
============================

• स्वाती धर्माधिकारी :-
इतकी समर्पक उत्तरे दिलीस...प्राउड ऑफ यु विश्वजीत

• रश्मी जांभेकर :-
Today you have given all the answers very nicely. We are glad that we got a chance to know you closely, Indeed it was a great experience. Wish you very good luck for your bright future..may all your wishes come true...

• ज्ञानेश वाकुडकर :-
विश्वजीत ची मुलाखत ही खरंच अभिमानाची..कौतुकाचीही गोष्ट आहे..! थांक्स...सर्व 'शाळा' परिवाराचे...

• नवनाथ पवार :-
वा विशू, तुझ्या ध्येयाशी तू खरेच प्रामाणिक आहेस... कितीही उलट तपासणी घेतली तरी उत्तराची दिशा तीच असते.... मला तुझा आभिमान आहे... यश विश्वजीतचे नाही तर दुसरे कोणाचे असणार .... यशस्वी हो ... आम्हाला डोळे भरून पाहू दे !
शाळेच्या इतिहासातील सर्वाधिक रंगलेली , आणि मला आवडलेली मुलाखत ! Milestone...

• प्रकाश जोशी :-
विश्वजीत, तुला एकही प्रश्न न विचारता अगदी मूकपणे तुझी मुलाखत वाचत होतो. तुझे कौतुक करावे तेवढे थोडेच. आम्ही गोव्यात राहतो. एक दोन वर्षाच्या फरकाने आंबेजोगाईस येणे होते. तुला भेटायची इछा आहे. बाकी योगेश्वरीची कॄपा. तुझ्या भावी जीवनासाठी शुभेच्छा.

• श्रीधर जहागीरदार :-
विश्वजीत जेव्हापासून तुला ओळखतो, तुझ्यातल्या 'स्पार्क' ने अचंभित होतो... तुझी ही मुलाखत तर फारच छान झाली. तुझे विचार किती सुस्पष्ट आहेत!! अनेक शुभेच्छा!!

• प्रकाश रेडगावकर :-
विश्वजितची मुलाखत वाचली. त्याची नि माझी छान दोस्ती झाली आहे मला त्याची काही माहिती नव्हती. आणि अचानक तो माझा बेस्ट फ्रेंड झाला .मला आवडला .त्याला मी नेहमीच प्रतिक्रिया देत असतो .
त्याच्या जवळ जो आत्मविश्वास आहे त्याचे मला खरोखरच कौतूक आहे आदर आहे .
अजून तो लहान आहे .
त्याची स्वप्ने परमेश्वराने पूर्ण करावी म्हणून मी देवाजवळ आभाळभर प्रार्थना करतो.
त्याला मी मागे म्हणालो होतो तेंडूलकर रिटायर होईल पण तू रिटायर होणार नाहीस.

• वसंत इभाड :-
तुझी मुलाखत वाचली तुझ्या चौफेर प्रतिभेला ___/|\___

• बालाजी थेटे :-
विश्वजित मनापासून अभिनंदन मित्रा फार सुंदर मुलाखत झाली तुझ्यातला ठासून भरलेला कलाकार ,विचार,तुम्ही जिद्द तुझ्या स्वाभिमानी स्वभावाला मानाचा मुजरा माफ़ कर मित्रा तुझ्या मुलाखती साठी आलो होतो पण आचानक दोन दिवस बाहेर फिरतीवर होतो एक सुंदर चांगली मुलाखत याला लाइव जी मजा आसते त्या पासून वंचित राहिलो तू खरा विश्व-जीत आहेस तुझ्या आई वडिल याना माझा मनापासून प्रणाम पुन्हा एकदा तुझ्या भावी वाटचालीस शुभेच्छा

• वसंत ढोबळे :-
विश्वजीत तुझी मुलाखत वाचली ..... मनाने पक्का .... विचारांनी सच्चा .... जरी आहे तू बच्चा... नागपूर येथे आयोजित केलेल्या शब्द साहित्य संमेलनात तुला मी स्टेज वर बघितले होते.

• रावसाहेब बोराडे :-
विश्वजित, कालच्या तुझ्या मुलाखतीवर मी बेहद्द खुष आहे .या खुशीचे प्रतिक म्हणून मी माझे एक पुस्तक तुला सुभेच्छा भेट म्हणून पाठविणार आहे .तरी तुझा पोस्टल पत्ता दे...
===========================================

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा