वृत्तांत

सत्यमेव जयते : भाग १ : स्त्री भृणहत्या 



आमीर खानने सत्यमेव जयते हा कार्यक्रम चालू करून फार मोठे कार्य केले आहे. देशाला विळखा घातलेल्या समस्यांवर कोणताही आक्राळेस्तपणा न करता आमीरने प्रबोधनाचे कार्य हाती घेतले आहे. सुरुवातीच्या आपल्या मनोगतातच त्याने त्याचा हेतू स्पष्ट केला. पहिल्या भागाचा विषय होता स्त्री-भृणहत्या. आमीर व त्याच्या टीमने अत्यंत अभ्यासपूर्ण असे संशोधन करून सर्वांना विचार करण्यास प्रवृत्त केले. अमिषा याग्निक, परवीन खान, मीतू खुराना या महिलांनी अनेक संकटांना तोंड देत आपल्या मुलींना कसा जन्म दिला याची कहाणी त्यांच्या तोंडून ऐकताना सर्वांचेच डोळे पाणावले. सासरच्यांनी त्यांना त्रास देऊनही त्यांनी खंबीरपणे आपली वाट कशी निवडली, ही गोष्ट अनेकांना प्रेरणा देऊन गेली. १९९१ पासून आजपर्यंत मुलींच्या संख्येत प्रचंड घट झाली आहे. गेल्या ३०-४० वर्षांत सुमारे ३ करोड मुलींची गर्भातच हत्या करण्यात आल्याची धक्कादायक बाब या निष्कर्षातून समोर आली. संपूर्ण भारतालाच या समस्येने वेधले आहे. ग्रामीण व अशिक्षित लोक असे करतात, हा लोकांचा रूढ समजही या संशोधनाने खोडून काढला. आय.ए.एस. अधिकारी, सी.ए., आरोग्य विभागाचे अधिकारी, डॉक्टर्स, प्राध्यापक, मोठमोठे पॅकेज घेऊन कंपन्यांत काम करणारे यांसारखे तथाकथित सुशिक्षित लोक यात अग्रेसर असल्याचे दिसून आले. असे असतानाही आदिवासी लोक मात्र या सुशिक्षितांपेक्षा समजदार निघाले. डॉ. बेदी यांनी या समस्येचा मुळापासून शोध घेतला. केनियाने या समस्येला कसे नष्ट केले ते बेदींनी सांगितले. अशातच मीना शर्मा व श्रीपाल शक्तावत या राजस्थानच्या दोन धाडसी पत्रकारांनी केलेल्या स्टिंग ऑपरेशनमधून धक्कादायक माहिती समोर आली. विविध वाहिन्यांवर ही क्लिपिंग दाखविल्या गेली ; परंतु व्यर्थ. त्यांनी रंगेहाथ पकडलेले डॉक्टर्स आजही सराईतपणे हा धंदा करत आहेत. मुलींना यमुनेत फेकून द्या, असे म्हण्यासही हे डॉक्टर्स धजावत नाहीत. याकरिता आमीर खान लोकांचे समर्थन घेऊन राजस्थान सरकारला पत्र लिहणार आहे. एरवी कचराकुंडीत जाणारे हे पत्र लोकांच्या पाठिंब्यामुळे नक्कीच यश मिळवून देईल. यापुढील भीषण समस्येचीही जाणीव आमिरने करून दिली. विविध सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांच्या परिसरातील परिस्थिती विशद केली. पंजाबमधील नवाशहर येथील परिवर्तनाने लोकांमध्ये नवी आशा निर्माण केली. आपण मनावर घेतले तर नक्कीच ही परिस्थिती बदलू शकतो. आमीर व त्याच्या टीमला या कार्यासाठी सलाम व अनंत शुभेच्छा !!!

:- विश्वजीत दीपक गुडधे,
अमरावती. 

(ज्यांनी पहिला भाग बघितला नाही त्यांच्याकरिता पहिल्या भागाची यु-ट्यूब लिंक :http://www.youtube.com/watch?feature=player_embedded&v=u1vASMbEEQc )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा