गझल


रंग नेत्यांचे 

  
फायद्यासाठी बदलती रंग नेत्यांचे 
ही 'खुबी' त्यांची, नव्हे हे व्यंग नेत्यांचे  

ऐन कैदेतच कसे पडतात आजारी ?
राहते शाबूत तोवर अंग नेत्यांचे  

एकही संधी न जावी धन जमविण्याची 
या विचारातच सदा, मन दंग नेत्यांचे 

राहती केवळ शिव्या ठासून भरलेल्या 
गाजते 'भाषण' तरी बेढंग नेत्यांचे  

ना कधी शिकले, न साधी घेतली पदवी 
पण तरी आहे, विपुल 'व्यासंग' नेत्यांचे   

• विश्वजीत दीपक गुडधे,
अमरावती.
================================================================


एकदा तरी 



पडेल का हवे तसेच दान एकदा तरी 
बनेल का गरीब हा प्रधान एकदा तरी 

रुसू नकोस पावसा ! असा यथेच्छ बरस की 

फुलेल हे उजाड माळरान एकदा तरी
 
मजा नि गंमती करायला हवेय बालपण 

नि व्हाव वाटते पुन्हा लहान एकदा तरी
 
मिळेल का अनुभवयास निमिषमात्र सुख मला ? 

जगून या युगात वेगवान एकदा तरी 

मिटून जात-पात, धर्म, संप्रदायची दरी 

दिसेल का हरेक जण समान एकदा तरी 

हवी अशी बुलंद झेप जीवनात 'विश्वजित' 

तुझ्यापुढे झुकेल आसमान एकदा तरी… 

• विश्वजीत दीपक गुडधे,

अमरावती.

================================================================
कधी कधी 



वाटे मनास तैसे करतो कधी कधी

नेईल वाट तिकडे वळतो कधी कधी



वर्षाव हा सुखांचा ना भावतो मला

दुःखांतही अता मी रमतो कधी कधी



इतरांचं दुःख देई पीडा मला बहुत

मी हास्य दुःखितांचे बनतो कधी कधी



कामास ना मिळे येथे दाम नेहमी

श्रमिकच इथे उपाशी मरतो कधी कधी



विश्वात या हरेकाची वेगळी तऱ्हा

हा खेळ बाहुल्यांचा बघतो कधी कधी



• विश्वजीत दीपक गुडधे,

अमरावती.

================================================================
जागर 



लोकांस आता जागवा पुन्हा 

विझल्या मशाली पेटवा पुन्हा


डोक्यास टाळे लावती सदा 
सुस्तांस साऱ्या चेतवा पुन्हा


आजन्म सोसे बापुडा इथे

सोशीक लोकां जागवा पुन्हा



झोपून कैसे चालणार हो ?

बळ आपलेही दाखवा पुन्हा 



संधी न येणे विश्वजित अशी 

संदेश माझा पोचवा पुन्हा




• विश्वजीत दीपक गुडधे,

अमरावती.

===============================================================

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा